पुण्यात सिलेंडरचा स्फोट अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव अर्धा तास आगीचे लोट

पुणेशहरातील अप्पर डेपो परिसरात मंडप साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले. दाट लोकवस्तीच्या भागात ही आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग इतकी भीषण होती की धुराचे मोठे लोट दूरवरूनही दिसत होते.

दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अग्निशमन नियंत्रण कक्षाला आग लागल्याची माहिती मिळताच सुरुवातीला दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. मात्र गोडाऊनमध्ये मंडपासाठी वापरले जाणारे कपडे, बांबू, सजावटीचे साहित्य आणि ज्वलनशील वस्तू मोठ्या प्रमाणात असल्याने आग झपाट्याने पसरली. (warehouse) परिस्थिती गंभीर होताच अतिरिक्त मदत मागवण्यात आली आणि अखेरीस तब्बल दहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

आगीदरम्यान गोडाऊनमध्ये ठेवलेला घरगुती गॅस सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाला. या आवाजामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि अनेक जण घराबाहेर व रस्त्यावर आले. परिसरात इतर दुकाने आणि घरे असल्याने आग शेजारील इमारतींपर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली होती.अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे अर्धा तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. (warehouse) त्यानंतर बराच वेळ कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले, जेणेकरून पुन्हा आग भडकू नये. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनाही बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले होते.

या आगीत पाच मोटारसायकली पूर्णपणे जळून खाक झाल्या.(warehouse) तसेच मंडप साहित्य वाहतुकीसाठी उभा असलेला एक टेंपोही जळून नष्ट झाला. गोडाऊनमधील बहुतांश साहित्य भस्मसात झाल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकाऱ्यांकडून पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिकांनी सांगितले.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?

.