शिवसेना(Shiv Sena) पक्ष आणि त्याच्या धनुष्यबाण या चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सुनावणी आज ८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादास सुरुवात केली. मात्र, ही सुनावणी पूर्ण न होता आता १२ आणि १३ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

या सुनावणीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, “खरी शिवसेना कोणाची?” या प्रश्नाचे उत्तर पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आजच्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची लवकर सुनावणी घेणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी त्यांनी न्यायालयासमोर केली.
सिब्बल यांच्या युक्तिवादादरम्यान काही अन्य वकिलांनी वारंवार मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, त्यावर त्यांनी “आधीच खूप वेळ गेला आहे, कृपया आम्हाला आमचा वेळ द्या,” असे सांगत आपली बाजू स्पष्ट केली. त्यांनी आपल्या युक्तिवादासाठी किमान ४५ मिनिटांचा वेळ मागितला, त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी १२ आणि १३ नोव्हेंबरला घेण्याचे ठरवले.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद होईल. त्यानंतर खऱ्या शिवसेनेबाबतचा(Shiv Sena) अंतिम निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले की, “आम्ही कोर्टात महापालिका निवडणुका जानेवारीत होणार आहेत, हे स्पष्ट केले. न्यायालयाने आम्हाला सांगितले की त्या निवडणुका होण्यापूर्वीच ही सुनावणी पूर्ण केली जाईल.” सुरुवातीला १९ नोव्हेंबर ही तारीख विचारात होती, परंतु कोर्टाने आधीची म्हणजेच १२ नोव्हेंबरची तारीख दिली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

असीम सरोदे यांच्या मते, १२ नोव्हेंबरपासून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आपला युक्तिवाद सुरू करतील, त्यानंतर इतर वकील बाजू मांडतील. त्यामुळे १२, १३ आणि १४ नोव्हेंबर या तीन दिवसांत सुनावणी पूर्ण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे, आगामी निवडणुका आणि शिवसेनेचे भवितव्य यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
RBI ने ‘या’ बँकेवर घातले निर्बंध; ठेवीदारांना खात्यातील पैसे काढता येणार नाहीत
दूषित पाण्याचा कहर….
सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता