महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये (political)2019 पासून वेगवेगळ्या पक्षांच्या युत्या आणि आघाड्या जनतेला पाहायला मिळाल्या. भाजपाबरोबर मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटीवरुन फिस्कटल्याने 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली. यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला विरोधी पक्षाच्या बाकावर बसावं लागलं. यानंतर 2022 च्या राजकीय घडामोडींनंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे 39 आमदारांसहीत भाजपाबरोबर गेले अन् त्यांच्या सहकार्याने सत्तेत बसले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर दीड वर्षांनी अजित पवारही राष्ट्रवादीतील बहुतांश आमदारांसहीत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर 2024 ची निवडणूक महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना विरुद्ध महायुतीमधील भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी अशी झाली.

मात्र माहविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये वेगळी समिकरणं पाहायला मिळू शकतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंमधील भेटीगाठी वाढल्या आहेत. मात्र या दोन्ही सेनेंच्या युतीच्या जोरदार चर्चा सुरु असतानाही यापूर्वी महाराष्ट्राने कधीही न पाहिलेली अनोखी युती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेना आणि मनसेच्या युतीसंदर्भातील चर्चेबद्दल संजय राऊत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात मागील दोन आठवड्यात तीन वेळा राजकीय चर्चा झाल्याची वृत्त समोर आलं आहे. मनसे आणि शिवसेना युतीची चर्चा पुढे जात असल्याची माहिती मिळत असून या युतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला (political)सहभागी करुन घेण्यासंदर्भात हलचाली सुरु असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सगळ्या युतीसंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दोन्हीकडील चर्चेची माहिती राऊतांच्या माध्यमातून एकमेकांना दिली जात असल्याचे समजते.
महाविकास आघाडीमधील काँग्रेसची भूमिका ही अनेक विषयांवर मनसेपेक्षा वेगळी आहे. यापूर्वीही अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या विधानांवरुन हे स्पष्ट केलं आहे. मराठीचा मुद्दा असो, परप्रांतियांचा मुद्दा असो किंवा अगदी इतर वैचारिक मुद्द्यांवर राज ठाकरेंसोबत जाणं काँग्रेसला अवघड होईल असं चित्र दिसत आहे. त्यामुळेच राज ठाकरे महाविकास आघाडीत जाण्याची शक्यता कमीच असल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरेंनीही यापूर्वीच ‘इंडिया आघाडी’ आणि स्थानिक राजकीय आघाडी वेगळे विषय असल्याचं सांगत मनसेसोबतच्या युतीची वाट आपल्या बाजूने मोकळी करुन घेतली आहे.

राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मागील दोन आठवड्यात तीन बैठका झाल्या आहेत ज्यामध्ये पुढील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने दोन्ही पक्षाच्या रणनीती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता संजय राऊतांचे हे प्रयत्न यशस्वी ठरतील का? खरोखरच असं झालं तर राज्यातील महाविकास आघाडी संपुष्टात येईल. 2019 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस राजकीय पटलावर एकटी पडेल. राऊतांचा प्रयत्न यशस्वी झाल्यास दोन्ही सेना आणि पवारांची राष्ट्रवादी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीविरुद्ध रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
नवविवाहित जोडप्याने सर्वांसमोर ओढले पांघरूण अन्… लाजेने सर्व चूर….Video Viral
महायुतीमध्येच नेत्यांची चोरी; निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना धक्का
नोकरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार