विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील गळती थांबण्याचे नाव घेत नसून, आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूरमधील काँग्रेसचे (Congress)मोठे नेते आणि माजी आमदार दिलीप माने हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या एका महत्त्वपूर्ण भेटीमुळे या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मात्र मोठे अपयश आले. महायुतीने तब्बल २३२ जागा जिंकत राज्यात पुन्हा सत्ता मिळवली, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांना मिळून केवळ ५० जागांवरच समाधान मानावे लागले. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला.

या निकालानंतर महाविकास आघाडीतून महायुतीकडे नेत्यांचा ओघ सुरू झाला आहे. विशेषतः शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटात प्रवेश केला. आता हाच फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटालाही बसत असून, पक्षांतराचे सत्र सुरूच आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी हे पक्षांतर आणखी वेग घेण्याची शक्यता आहे.

आता काँग्रेसचे(Congress) माजी आमदार दिलीप माने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे. या भेटीनंतर स्वतः दिलीप माने यांनीच प्रतिक्रिया देत या वृत्ताला एकप्रकारे दुजोरा दिला आहे. माने म्हणाले, “आम्हाला परवा दिवशी मुख्यमंत्र्यांकडून निरोप आला की, साहेबांनी तुम्हाला सायंकाळी सात-साडेसातला भेटायला वेळ दिली आहे. त्यानुसार आम्ही सर्वांनी जाऊन त्यांची भेट घेतली.”

या भेटीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचेही माने यांनी स्पष्ट केले आहे. जर दिलीप माने यांनी काँग्रेसची साथ सोडली, तर आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीपूर्वी हा पक्षासाठी एक मोठा धक्का मानला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या एका निरोपावर काँग्रेसचा शिलेदार थेट भेटीला जात असल्याने, काँग्रेसमधील अस्वस्थता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

हेही वाचा :

भारतात Triumph Speed Triple 1200 RX लाँच, किंमत…
‘वन नाईट स्टँडनंतर गरोदर राहिलेले…’; गर्भपाताबाबत प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
कोल्हापुरच्या महिला सुधारगृहात भयंकर कृत्य ६ नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न