इचलकरंजी:उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचने छत्रपती शिवतीर्थ ते गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर बाजार भरवू नये असे स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याचे इतिवृत्त महापालिका प्रशासनाने सादर केले होते. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा रस्त्यावर बाजार भरला.रस्त्यावर बाजार भरल्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासनावर सर्वत्र टीका होऊ लागली. तरीही सुस्त अवस्थेत असलेल्या महापालिकेने शांततेची भूमिका घेतली. अखेर पोलिसांनी पुढाकार घेत उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली आणि रस्ता रिकामा केला. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनाचे सर्वत्र अभिनंदन झाले, तर महापालिका प्रशासनावर खरपूस टीका झाली.येथून पूढेही सदर रस्ता रिकामा ठेवण्यासाठी महापालिकेने पोलीस प्रशासनास साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आ. राहुल आवाडेंचे “पर्मनंट सोल्युशन” अद्याप गायबजयहिंद मंडळाजवळ विक्रेत्यांना मंडप उभारणीस मनाई केल्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी स्वतः भेट देत विक्रेत्यांना परवानगी मिळवून दिली होती. तसेच आपत्कालीन व्यवस्थेस अडथळा न आणता व्यवसाय करण्याची व्यवस्था आणि या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणजेच “पर्मनंट सोल्युशन” काढण्याचे आश्वासनही दिले होते.मात्र रस्ता पुन्हा व्यापला गेला तरी या पर्मनंट सोल्युशनचा काहीच मागमूस नाही. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रश्नावर ठोस पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.