कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
डॉक्टर संपदा मुंडे या तरुणीच्या आत्महत्याकडे एक सर्वसाधारण घटना म्हणून पाहता येणार नाही. शासन, प्रशासन, पोलीस लोकप्रतिनिधी, यांच्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी, एक मुर्दाड व्यवस्था समाजासमोर आणणारी ही आत्महत्या आहे. बीड जिल्ह्यातील एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाने सत्यात, वास्तवात आणलेल्या एका स्वप्नाची झालेली ही हत्या आहे. सावित्रीच्या लेकीची ही शोकांतिका आहे(Maharashtra). इतकेच नाही तर सुसंस्कृत महाराष्ट्राच्या छाताडावर प्रहार करणारी ही घटना आहे. डॉक्टर संपदा च्या आत्महत्येला खाकी वर्दीसह अन्य काही घटकही जबाबदार आहेत आणि या सर्वांना कायदेशीर कारवाईच्या टाचेखाली आणले पाहिजे. बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संपदा ही सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणी. तिचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. तिची डॉक्टर व्हायची इच्छा होती. तिच्या गरीब आई-वडिलांनी कर्ज काढून वैद्यकीय महाविद्यालयात तिला घातले.

मुळातच हुशार असलेल्या संपदा ने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वैद्यकीय पदवी प्राप्त केली. सातारा जिल्ह्यातील फलटण ग्रामीण वैद्यकीय उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून ती काम करत होती. फलटणमध्येच भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीतील राहत होती.ग्रामीण रुग्णालयाशी, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी पोलिसांचा अनेकविध कारणे दैनंदिन संबंध येत असतो. एम एल सी म्हणजे मेडिकल लीगल केसच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी पोलिसांचा प्रत्यक्ष संबंध येत असतो. मेडिकल एव्हिडन्स तथा वैद्यकीय पुरावे रुग्णालयातूनच उपलब्ध होत असतात(Maharashtra). या पुराव्याच्या आधारे आरोपींना शिक्षा होत असते. हाणामारी, गर्दी मारामारी, खून, खूनाचा प्रयत्न, या गंभीर गुन्ह्यात वैद्यकीय पुरावा अतिशय महत्त्वाचा असतो. अशा पुरावा प्रक्रियेत डॉक्टर संपदा मुंडे हिचा नित्याचा सहभाग होता. अशा प्रकरणात राजकीय व्यक्तींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दबाव येत असतो. डॉक्टर संपदा मुंडे यांनी भक्कम वैद्यकीय पुरावे देऊ नयेत. संशयित आरोपींना निर्दोष सुटण्यासाठी फायदा होईल अशा प्रकारचे अहवाल त्यांनी तपास अधिकाऱ्यांना देण्याबद्दल त्यांच्यावर लोकप्रतिनिधींचा दबाव होता.
त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या दबावाबद्दल वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. फौजदार गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्याकडूनही त्यांच्यावर त्यांना हवे तसे वैद्यकीय अहवाल देण्याबद्दल दबाव येत होता. फौजदार गोपाळ बदने या विकृताने डॉक्टर संपदा यांच्यावर चार ते पाच वेळा बलात्कार केला पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर हा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता अशा आशयाची सुसाईड नोट डॉक्टर संपदा यांनी आपल्या हातावर लिहिलेली होती. एका शेतकरी कुटुंबातील डॉक्टर बनलेली एक तरुणी असहाय होऊन आत्महत्या करते ही घटना “व्यवस्थे’बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. डॉक्टर संपदा मुंडे हिने वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडे लिखित स्वरूपात तक्रार केली होती. या तक्रारीची अतिशय गांभीर्याने दखल घेतली गेली असती तर डॉक्टर संपदा मुंडे हिला टोकाचे पाऊल उचलता आले नसते. त्यामुळे तिच्या आत्महत्येला ग्रामीण रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत.पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तितकेच या घटनेला जबाबदार आहेत.
फौजदार गोपाल बदने, पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर हे जितके जबाबदार आहेत तितकेच डॉक्टर संपदा यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणारे जबाबदार आहेत. या सर्वांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कार्यकर्त्यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात डॉक्टर संपदा मुंडे यांनी कार्यकर्ते अडचणीत येतील असे वैद्यकीय पुरावे अर्थात वैद्यकीय अहवाल तपास अधिकाऱ्यांना देऊ नयेत अशा प्रकारचे दबाव त्यांच्यावर एका लोकप्रतिनिधीकडून येत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. डॉक्टर संपदा मुंडे यांनी गळफास लावून घेण्यापूर्वी आपल्या हातावर आपण आत्महत्या का करत आहोत याचे कारण लिहिले आहे. याशिवाय त्यांना त्यांच्या कर्तव्यात कशा प्रकारचे अडथळे आणले जात आहेत याबद्दल कागदावर सविस्तरपणे लिहिले आहे.

त्यांनी आपली मानसिक व्यथा घरच्यांना सुद्धा सांगितली होती. सामाजिक सेवा समजून वैद्यकीय सेवेत उतरलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासमोर रुग्णसेवेचे ध्येय होते. बीड जिल्ह्याच्या दुर्गम भागातून आलेल्या या युवतीला प्रत्यक्षात एका भयानक वास्तवाचा सामना करावा लागला. हा सामना एकतर्फी असल्यामुळे तिचा पराभव झाला(Maharashtra). आपणाला वरिष्ठांची साथ मिळत नाही म्हणून हतबल झालेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. उच्चशिक्षित तरुणीही आज सुरक्षित नाहीत. हेच या घटनेवरून अधोरेखित झाले आहे.
हेही वाचा :
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम…
इथे जीव मुठीत ठेवून वाहने चालवावी लागतात!
सोनं खरेदीदारांना सर्वात मोठा दिलासा; सोनं ‘इतक्या’ हजारांनी स्वस्त…