मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमिनीच्या वादातून सुमारे १५ जणांच्या गटाने एका शेतकऱ्याला जीपने चिरडून त्याची हत्या केली. या घटनेत शेतकरी कुटुंबातील इतर चार सदस्यही जखमी झाले आहेत. या रक्तरंजित संघर्षात एका भाजप नेत्याचे नाव समोर येत आहे. भाजप नेत्याने(BJP leader) शेतकऱ्याला मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ला करणाऱ्या भाजप नेत्याचे नाव महेंद्र नगर असल्याची माहिती आहे. तर हल्ल्यात मृत्यू झालेल्या ४० वर्षीय मृताचे नाव रामस्वरूप धाकड असे आहे.

या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा जिल्ह्याच्या फतेहगड पोलिस स्टेशन हद्दीतील गणेशपुरा गावात ही घटना घडली. रविवारी सहा एकर शेतजमिनीवरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. शेतकरी त्याच्या शेताकडे जात असताना भाजप नेत्याने (BJP leader)त्याला थांबवले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.रविवारी शेतात असलेल्या शेतकऱ्यावर काही जणांच्या टोळक्याने पहिल्यांदा काठ्या आणि रॉडने हल्ला केला. शेतकऱ्याने तिथून पळ काढताच त्याच्यावर जीपने हल्ला करण्यात आला. या हल्यात जीपखाली चिरडून शेतकरी गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. भाजप नेत्याने १५ साथीदारांसह शेतकऱ्यावर लाठ्या, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याला मारण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याच्यावर जीपने हल्ला केला.

या हल्ल्यादरम्यान, शेतकऱ्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या शेतकऱ्याची पत्नी ३८ वर्षीय पत्नी विनोद बाई, १७ वर्षीय मुलगी कृष्णा नगर, १७ वर्षीय नातेवाईक तनिषा नगर आणि ५० वर्षीय राजेंद्र नागर हेदेखील गंभीर जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे, हल्लेखोरांनी मृताची पत्नी विनोद बाई आणि दोन अल्पवयीन मुलींचे कपडेही फाडले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू झाली आहे.भाजपचे स्थानिक नेते महेंद्र नगर यांच्यावर गावातील लहान शेतकऱ्यांना धमकावून जमीन बळकावण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, नगर यांनी आपल्या काही साथीदारांसह एका शेतकऱ्याला मारहाण करून गंभीर जखमी केले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सदर घटनेत पीडित शेतकऱ्याचे हात-पाय तोडण्यात आल्याचा आणि त्याच्यावर थार जीप चालवून हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनाही धमक्या देण्यात आल्या, तसेच अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन आणि हवेत गोळीबार केल्याचाही आरोप आहे.जखमी शेतकऱ्याला तातडीची मदत मिळू नये म्हणून त्याला गावाबाहेर जाण्यापासून जवळपास एक तास रोखण्यात आले, अशीही माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली असून, संबंधित सर्व आरोपींचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा :

कोल्हापूरमध्ये शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न…
 क्रिकेट संघातील ‘या’ लोकप्रिय कॅप्टनचा पत्ता कट….
सुसंस्कृत (?) महाराष्ट्र देशी “खाकी” चे हिडीस दर्शन!