ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर कॅच घेताना गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कॅनमध्ये त्याला स्प्लीनला म्हणजेच प्लीहा दुखापत (spleen)झाल्याचे दिसून आले. प्लीहा हे मानवी शरीरामधील लसीका संस्थेतील सर्वांत मोठे इंद्रिय असून ते उदरपोकळीच्या डाव्या बाजूला नवव्या आणि बाराव्या बरगड्यांदरम्यान असते. म्हणजे साधारणपणे उजव्या बाजूला हृदय असते तसेच डाव्या बाजूला हृदयापेक्षा थोड्या खालच्या बाजूला प्लीहा असतं.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार मते, श्रेयसला स्प्लीनमध्ये जखम झाल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि त्याला आयसीयूमध्ये ठेवावे लागले होते. आता त्याला आयसीमधून बाहेर आणण्यात आलं असून सध्या, श्रेयस अय्यरची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर, अनेकजण स्प्लीन म्हणजेच प्लीहा काय असतं आणि ते काय काम करतं याबद्दल सर्च करताना दिसत आहेत. स्प्लीनच्या दुखापतीच्या संभाव्य धोक्यांबद्दल अनेजण जाणून घेण्यासाठी गुगल आणि इंटरनेटची मदत घेत आहेत. याचबद्दल जाणून घेऊयात सविस्तरपणे…
अमेरिकेतील क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार, स्प्लीन हा शरीराच्या डाव्या बाजूला, बरगड्यांच्या खाली आणि पोटाच्या वर स्थित एक लहान अवयव आहे. त्याला हिंदीत ‘टिली’ तर मराठीत ‘प्लीहा’ म्हणतात. प्लीहाचे प्राथमिक कार्य रक्त शुद्ध करण्याचं आहे. प्लीहा जुन्या किंवा खराब झालेल्या लाल रक्तपेशी काढून टाकते आणि शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी नवीन पांढऱ्या रक्तपेशी तयार करते. प्लीहा हा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा एक आवश्यक भाग आहे. ते रक्तातील बॅक्टेरिया आणि विषाणू ओळखण्यास आणि नष्ट करण्यास मदत करते. प्लीहा रक्त साठवते आणि गरज पडल्यास शरीराला रक्त पुरवते. जेव्हा दुखापत किंवा अपघातामुळे शरीराला रक्त कमी होते तेव्हा हे राखीव रक्त उपयोगी पडते.
जेव्हा एखादी व्यक्ती अचानक जोरदार आघाताने पडते किंवा पोटाला गंभीर दुखापत होते तेव्हा प्लीहाला दुखापत होऊ शकते किंवा ते फुटू शकते. प्लीहाला झालेल्या या दुखापतीला प्लीहा (spleen)लेसरेशन म्हणतात. प्लीहा दुखापतीमुळे डाव्या ओटीपोटात वरच्या बाजूला तीव्र वेदना होतात. कोणीतरी पोटावर दाब टाकत असल्यासारखं वाटत राहतं. जर प्लीहा फुटला तर अंतर्गत रक्तस्त्राव होतो. अशाप्रकारचा अंतर्गत रक्तस्राव होतं ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे. जर अंतर्गत रक्तस्त्राव वाढला तर रुग्णाची प्रकृती खालावून अगदी मृत्यू देखील होऊ शकतो.

प्लीहाच्या किरकोळ दुखापतींसाठी, डॉक्टर सहसा बेड रेस्ट आणि देखरेखीची शिफारस करतात. जर रक्तस्त्राव गंभीर असेल तर शस्त्रक्रिया करायला सांगतिलं जातं. या शस्रक्रियेला स्प्लेनेक्टोमी म्हणतात. या शस्त्रक्रियेत प्लीहाचा काही भाग किंवा संपूर्ण भाग काढून टाकला जातो. अशा परिस्थितीत, रुग्णाने भविष्यातील संसर्ग टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली पाहिजे, कारण प्लीहा नसल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. प्लीहा शरीराला रोगांपासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
आरोग्य तज्ञ असा सल्ला देतात की, प्लीहाच्या दुखापतीतून बरे झाल्यानंतर, रुग्णाने किमान काही आठवडे कोणत्याही शारीरिक हालचाली किंवा खेळांपासून दूर राहावे. रुग्णासाठी औषधे, निरोगी आहार आणि पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. जर ताप, पोटदुखी किंवा थकवा यासारखी लक्षणे पुन्हा दिसून आली तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. प्लीहाचा आकार लहान असू शकतो, परंतु त्याचे कार्य फार महत्त्वाचे असते. या अवयवाला झालेली कोणतीही दुखापत ही वैद्यकीय आणीबाणीच समजली जाते. अशा परिस्थितीत, शक्य तितक्या लवकर उपचार घेणे आवश्यक आहे, अन्यथा व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
हेही वाचा :
भरधाव कारची स्कूटरला धडक; महिला फरपटत गेली अन्… ; अपघात करुन चालकाने काढला पळ, Video Viral
राष्ट्रवादीचे कार्यालय की तमाशाचा फड?
सर्वसामान्यांना झटका! साखरेच्या दरात वाढ होणार?