गुन्हेगारीचा वाढता प्रभाव आणि त्याचा राजकारणाशी होत असलेला (backgrounds) संगम इचलकरंजी शहरात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पहिल्याच महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील गुन्हेगारी वास्तव ठळकपणे समोर आले असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तब्बल २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शहराच्या राजकीय इतिहासात हा आकडा धक्कादायक मानला जात असून, नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता व्यक्त केली जात आहे.इचलकरंजीला गुन्हेगारांचा राजकीय शिरकाव नवीन नाही. याआधी नगरपालिकेच्या कारकिर्दीतही रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सभागृहात स्थान मिळाले होते. मात्र, महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत अशा उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून येत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. उपलब्ध माहितीनुसार सुमारे ११ टक्के उमेदवारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हे उमेदवार केवळ अपक्ष नसून विविध राजकीय पक्ष व आघाड्यांचे अधिकृत उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवत आहेत, ही बाब विशेष चिंतेची ठरत आहे.

या निवडणुकीत मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यांत अडकलेले सराईत गुन्हेगार,(backgrounds) खून व खुनाच्या प्रयत्नातील आरोपी तसेच सातत्याने कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्ह्यांतील आरोपींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. काही गुन्हेगारांनी थेट उमेदवारी न करता आपल्या पत्नी, भाऊ किंवा अन्य कुटुंबीयांना मैदानात उतरवले असून, यामागे राजकीय पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार आढळून आले आहेत. त्याखालोखाल गावभाग पोलिस ठाणे हद्दीतही अशा उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुलनेने कमी, मात्र सराईत स्वरूपाचा गुन्हेगार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाची सूत्रे पुन्हा एकदा वादग्रस्त आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या हाती जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, महापालिका निवडणुकीत अवैध व्यवसायाशी संबंधित(backgrounds) उमेदवारांचाही प्रभाव वाढत असल्याचे चित्र आहे. शहराच्या काही वाढीव भागांतील प्रभागांत अवैध व्यवसाय करणाऱ्यांची संपूर्ण पॅनेल्सच उभी राहिल्याची चर्चा रंगली आहे. हे उमेदवार निवडून आल्यास शहराच्या प्रशासनावर आणि राजकारणावर त्यांचा प्रभाव अधिक मजबूत होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनानेही हालचाली वाढवल्या असून, शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील ४५ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी दीपक शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, संबंधित गुन्हेगारांना ठराविक कालावधीत इचलकरंजी शहरासह परिसरातील काही गावांत प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. तरीही निवडणूक रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची उपस्थिती कायम असल्याने, कायदा-सुव्यवस्था आणि लोकशाही मूल्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश