राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (party) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील पक्ष संघटनेतून एक महत्त्वाची घडामोड समोर आली असून युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वजीत मनोहर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या निर्णयामुळे शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या असल्याचे चित्र आहे.जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात सक्रिय असलेले विश्वजीत पाटील हे युवकांमध्ये प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जात होते. पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी त्यांनी विविध स्तरांवर काम केले होते. मात्र, अशा वेळी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात असून, आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विश्वजीत पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (party) महेबूब शेख यांना उद्देशून आपले अधिकृत राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या निर्णयामागील कारण वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले आहे. मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी टाकून सन्मान दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले आहेत. जिल्हा, तालुका आणि स्थानिक स्तरावरील नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रेमळ वागणुकीबद्दल ते कायम ऋणी राहतील, असे भावनिक शब्द त्यांनी पत्रात लिहिले आहेत. या पत्रामुळे राजीनाम्याचा निर्णय वैयक्तिक कारणांमुळे घेतल्याचे स्पष्ट होत असले तरी, राजकीय चर्चांना मात्र वेग आला आहे.
राजीनामा केवळ वरिष्ठ नेत्यांकडे न सोपवता विश्वजीत पाटील यांनी तो (party) थेट फेसबुकवरही पोस्ट केला आहे. या पोस्टमधून त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक आवाहन केले आहे. पक्षाचे काम करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ करावे, असे त्यांनी नमूद केले आहे. या पोस्टमुळेच ही बातमी झपाट्याने पसरली असून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यापासून(party) शरद पवार गटाने युवकांवर विशेष भर देत संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. विश्वजीत पाटील यांचा राजीनामा हा त्या प्रयत्नांना धक्का मानला जात आहे. ग्रामीण भागातील पक्ष संघटनावर याचा नेमका किती परिणाम होईल, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.तसेच, विश्वजीत पाटील यांचा पुढील राजकीय प्रवास काय असेल, ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार की काही काळ राजकारणापासून दूर राहणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश