कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी अवघे (security) दोन दिवस शिल्लक राहिले असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांकडून अंतर्गत जुळवाजुळव आणि हालचालींना वेग आला आहे. निवडणूक शांततेत पार पडावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताची अंमलबजावणी सुरू केली आहे. संवेदनशील प्रभागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, प्रत्येक हालचालीवर वरिष्ठ पातळीवरून नजर ठेवली जात आहे.बुधवारपासून कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात एकूण एक हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी, १२० अधिकारी, मोठ्या संख्येने होमगार्ड तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. मंगळवारी प्रचाराची सांगता होत असली तरी मतदानापूर्वीच्या दोन रात्री अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असल्याने रात्रगस्तीमध्ये लक्षणीय वाढ करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिल्या आहेत. रात्री कोणत्याही संशयास्पद हालचाली, मतदारांवर दबाव किंवा गैरप्रकार घडू नयेत, यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत.

प्रथमच होणारी इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक आणि (security) कोल्हापूरमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणारी पहिलीच निवडणूक असल्याने वातावरण अधिकच संवेदनशील झाले आहे. काही प्रभागांमध्ये ईर्षा आणि तणावाचे चित्र पाहायला मिळत असून, त्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोणत्याही प्रकारच्या अपप्रवृत्तीला थारा दिला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, या संदेशासाठी मंगळवारी शहरातील प्रमुख (security) मार्गांवरून सशस्त्र पोलिस संचलन करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सलग बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, स्थानिक पोलिसांसह बाहेरून आलेले शस्त्रधारी पोलिसही बंदोबस्तात सहभागी असतील. पोलिसांच्या या कडेकोट उपाययोजनांमुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश