टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 17व्या सामन्यात इटलीने नेपाळवर दणदणीत विजय (T20 World Cup) मिळवत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. या लढतीत नाणेफेक जिंकून इटलीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो अचूक ठरवला. शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर नेपाळचा डाव 19.3 षटकांत 123 धावांवर संपुष्टात आला. विजयासाठी 124 धावांचे माफक आव्हान इटलीसमोर होते.

या लक्ष्याचा पाठलाग करताना इटलीच्या (T20 World Cup) सलामीवीरांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. जस्टीन मोक्सा आणि अँथोनी मोक्सा या भावंडांनी नेपाळच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत अवघ्या 12.4 षटकांत एकही विकेट न गमावता संघाला विजय मिळवून दिला. जस्टीन मोक्साने 44 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 60 धावा केल्या, तर अँथोनी मोक्साने 32 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकार ठोकत नाबाद 62 धावा झळकावल्या. दोघांची 124 धावांची अविजित भागीदारी ही टी20 वर्ल्डकप इतिहासातील भावंडांमधील सर्वात मोठी भागीदारी ठरली. याआधी 2014 मध्ये कामरान अकमल आणि उमर अकमल यांनी 96 धावांची भागीदारी केली होती.

इटलीने या विजयासह आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. 120 पेक्षा अधिक धावांचा (T20 World Cup) पाठलाग करताना सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत इटली तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी 44 चेंडू राखून नेपाळला पराभूत केले. यापूर्वी वेस्ट इंडिजने 2024 मध्ये अमेरिकेविरुद्ध 55 चेंडू राखून, तर इंग्लंडने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 चेंडू राखून विजय मिळवला होता.

नेपाळसाठी हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील (T20 World Cup) दुसरा 10 विकेटने पराभव ठरला. याआधी 2025 मध्ये वेस्ट इंडिजने त्यांना अशाच फरकाने हरवले होते. दुसरीकडे, इटलीसाठी हा पहिलाच 10 विकेटने विजय आहे. तसेच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एखाद्या असोसिएट संघाने 10 विकेटने विजय मिळवण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी 2021 मध्ये ओमानने पीएनजीला 10 विकेटने पराभूत केले होते.
असोसिएट संघांच्या विक्रमी भागीदारीच्या यादीतही इटलीच्या या जोडीने तिसरे स्थान पटकावले आहे. 2021 मध्ये ओमानच्या अकिब लियास आणि जतिंदर सिंग यांनी 131 धावांची अविजित भागीदारी केली होती, तर स्कॉटलंडच्या मायकल जोन्स आणि जॉर्ज मुन्से यांनी 126 धावा जोडल्या होत्या. इटलीच्या या दमदार विजयामुळे स्पर्धेत त्यांचा आत्मविश्वास उंचावला असून पुढील सामन्यांसाठी ते अधिक जोमाने सज्ज झाले आहेत.

हेही वाचा :

मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य

कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?