कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली गावातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर आले असून मुख्य आरोपी शाहिद सनदीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. (shocking revelations) या प्रकरणात पोलिसांनी त्याचा मित्र शाहरुख देसाईलाही ताब्यात घेतले असून दोघांची चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान पीडित मुलींना धमकावणे, ब्लॅकमेल करणे आणि वारंवार अत्याचार केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.

माहितीनुसार, आरोपी शाहिद सनदीने सुरुवातीला आपल्या बहिणीच्या मैत्रिणीशी ओळख वाढवली. महाविद्यालयातील एका कार्यक्रमादरम्यान त्याने पीडित तरुणीसोबत सेल्फी घेतला आणि त्याच फोटोचा आधार घेत पुढे तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने पीडितेकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. विरोध केल्यानंतरही तिला आलिशान हॉटेलमध्ये नेऊन दोन ते तीन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली असून आरोपीने अत्याचाराचे व्हिडीओ तयार करून त्याद्वारे पीडितेला ब्लॅकमेल केले. हे व्हिडीओ दाखवून वारंवार शरीरसुखाची मागणी केली जात होती, असा आरोप आहे. पीडित तरुणी शाकाहारी असतानाही तिला जबरदस्तीने मांसाहार करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी आज कोल्हापूर वडगाव न्यायालयात झाली. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, अधिकृतरीत्या एकच तक्रार दाखल असली तरी आरोपीने आतापर्यंत किमान तीन मुलींवर अत्याचार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये महिलांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ आढळल्याचेही पोलिसांनी नमूद केले. हे व्हिडीओ आरोपीचा मित्र शाहरुख देसाईने मागवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व बाबींच्या तपासासाठी न्यायालयाने दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी सहा दिवसांनी वाढवली आहे.
या घटनेनंतर पुलाची शिरोली गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली. आरोपीने काही हिंदू मुलींवर अत्याचार केल्याची कबुली देणारा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप अधिक वाढला. यानंतर आरोपीच्या वडिलांनीही गावकऱ्यांसमोर हात जोडत मुलाला कठोर शिक्षा, अगदी फाशी द्यावी अशी मागणी केल्याची चर्चा आहे.
तपास यंत्रणा आता आरोपीच्या पूर्वीच्या हालचाली, मोबाईल डेटा, इतर संभाव्य पीडित मुली आणि साथीदारांच्या भूमिकेचा सखोल तपास करत आहे. या प्रकरणातील पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट
कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा