स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच आता सत्ताधारी असो वा विरोधक, प्रत्येकानंच पक्षबांधणीस सुरुवात केली आहे. यंदाच्यचा निवडणुकीत महायुतीकडून तरुणाईचं लक्ष वेधण्यासाठी आणि नव मतदारांची मतं मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवा नेत्यांना संधी देण्याचा आराखडा आखल्याचीही माहिती सूत्रांमार्फत मिळाली. पण, जागावाटपाच्या या धामधुमीत आणि राजकीय घडामोडींच्या या गर्दीत शिवसेनेच्या(Shiv Sena) शिंदे गटात नाराजीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेची साथ देणाऱ्या रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी येत्या काळात सक्रिय राजकारणात सहभागी होण्यास इच्छुक असतानाच त्याला प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी नाकारण्यात आली. शिंदेंच्या शिवसेनेनं घेतलेल्या या निर्णयानं आता कोकणात प्रामुख्यानं रत्नागिरीच्या स्थानिक राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
माहितीच्या वाट्यात रत्नागिरी नगर परिषदेची जागा शिवसेना(Shiv Sena) पक्षाला मिळत नसल्यानं आपण आपल्या मुलाला थांबवलं असं सांगत आपण उमेदवारीवरून नाराज नसल्याचं साळवी यांनी स्पष्ट केलं असलं तरीही त्यांचे सुपुत्र अथर्व साळवी यांच्या फेसबुक पोस्टनं मात्र सर्वांचीच नजर रोखली आहे. फेसबुकवर स्टेटस आणि पोस्ट शेअर करत त्यांनी रत्नागिरीकरांना भावनिक साद घातल्याचं पाहायला मिळालं. ‘पक्षनिष्ठा’ अशा मथळ्यासह हे पत्र त्यांनी पोस्ट करत नाती, राजकारण आणि पदांचा त्यात ठळक उल्लेख केरा.
महायुतीच्या निर्णयाने निवडणुकीतून बाजूला व्हावं लागत आहे, असं लिहित रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक लढण्याची आपली इच्छा अपूर्णच राहिल्याचं त्यांनी या पत्रात स्पष्ट केलं. ”नेतृत्व सोडत आहे, पण लोकांची सेवा तुमच्यासाठी धडपड आणि तुमच्या कामासाठी धावपळ कधीच सोडणार नाही. निवडणूक नाही, पण जबाबदारी तशीच आहे आणि ती मी मनापासून निभावणार आहे. आपल्या प्रभागाचा विकास ही माझी वचनबद्धता आहे. पद असो वा नसो, माझा मार्ग तुम्हालाच सोबत घेऊन जाणार”, असं सांगत पाठिंबा देणाऱ्यांसाठी आपण कायम, दिवसरात्र सेवेसाठी सज्ज असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
‘राजकारण बदलू शकतं… पदं येतात-जातात… पण नातं ? ते मात्र कायम राहतं – तुमचं आणि माझं’ अशी भावनिक पोस्ट करत अर्थव साळवी यांनी प्रभागातील नागरिकांसमोर आपल्या मनातील भावना मांडल्या. त्यांच्या या पोस्टवर खुद्द राजन साळवी यांची काय प्रतिक्रिया असणार आणि पक्षही त्यावर कसा व्यक्त होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :
कोणत्याही बँक किंवा कंपनीकडून कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी पहा, सावध रहा
आयटी पार्कजवळ भीषण अपघात; 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू
आज इतक्या हजारांनी स्वस्त झालं सोनं, वाचा भाव