ठाणे शहरातील धर्मवीर नगर येथील बीएसयुपी योजनेच्या घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देऊन अवघ्या 100 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर रहिवाशांनी व्हिडीओ कॉल द्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून एकच जल्लोष केला. मात्र एकीकडे हा निर्णय झालेला असतानाच या निर्णयावरुन ठाण्यात राजकीय राडा झाला आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये या निर्णयाच्या श्रेयवादावरुन हाणामारी झाली आहे(argument).

ठाण्यात भाजप आणि शिवसेनेत बीएसयुपी सदनिकांसाठी 100 रुपये मुद्रांक शुल्क केल्यामुळे निर्णयाच्या दिवशीच श्रेयवादाची लढाई दिसून आली. दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांनी हा निर्णय आपल्यामुळेच झाल्याचा दावा तर जल्लोष साजरा केला. या जल्लोषादरम्यानच दोन्हीकडील कार्यकर्ते, पदाधिकारी भिडले. भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुखांच्या कानशिलात लगावली.

शिवसैनिक बीएसयुपी सदनिकांच्या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल करुन जल्लोष साजरा करणार होते. मात्र दोन्ही पक्षात हुज्जत घातल्यामुळे वाद वाढला (argument)आणि त्यातूनच हाणामारी झाली. नौपाडा पोलिस ठाण्यात नारायण पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाण्यातील नौपाडा भागात हा प्रकार घडला. आतापर्यंत केवळ शाब्दिक बाचाबाची होत असलेल्या या दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमधील वाद आता हाणामारीपर्यंत पोहचल्याचं या वादावरुन दिसून येत आहे.

धर्मवीर नगरमधील बीएसयूपीच्या घरात राहणाऱ्या अनेक रहिवाशांना या नव्या निर्णयाचा फायदा झाला आहे. या घरामध्ये राहणारे रहिवाशी हे हातावर पोट असून छोटेमोठे काम किंवा व्यवसाय करतात. अशा रहिवाशांना मुद्रांक शुल्क म्हणून 54 हजार ते 1 लाख 34 हजारांपर्यंत अधिभार सोसावा लागणार होता. मात्र या निर्णयामुळे प्रतीदस्त 100 रुपये मोजून आपल्या घराची नोंदणी करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला होणार आहे.

युवा सेना कोर कमिटी सदस्य असलेले नितीन लांडगे यांनी याबाबत पुढाकार घेऊन या रहिवाशांचा संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिला. यावेळी धर्मवीर नगरमध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. तसेच शिंदे यांचा रहिवाशांच्या वतीने जाहीर सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रहिवाशांचे आभार मानले, तसेच या वाचलेल्या पैशांचा योग्य विनियोग करावा अशी अपेक्षा या महिला भगिनीनकडून व्यक्त केली. या निर्णयाचा फायदा ठाण्यातील बीएसयुपी आणि जे. एन. यू. आर. एम च्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या 6 हजार 343 गरीब कुटुंबांना होणार आहे.

हेही वाचा :

कॅल्शिअमच्या मुद्द्यात सगळ्यात पुढे! करा याचे सेवन, दूर होईल सर्व आजार
पाय घसरला अन् मिस जमैका स्टेजवरून पडली, झाला मोठा अपघात! रुग्णालयात केलं दाखल; Video Viral
लाडक्या बहीणींच्या पैशांवर डल्ला, आता कर्मचाऱ्यांना सरकारी ‘पाहुणचार’