जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा होताच कागल तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.(announced) नेत्यांच्या भेटीगाठी, चर्चा आणि संभाव्य युतीच्या हालचालींमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी संजय घाटगे आणि संजय मंडलिक एकत्र येतील, अशी चर्चा होती. मात्र, या हालचाली आता थंडावल्या असून, मंत्री हसन मुश्रीफ, संजय घाटगे आणि समरजितसिंह घाटगे यांची युती जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत.या युतीमुळे माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडल्याचे चित्र आहे. महायुतीचे घटक असतानाही मंडलिकांना स्वतंत्रपणे लढत द्यावी लागणार असल्याची शक्यता बळावली आहे. रविवारी झालेल्या बैठकीनंतर जागावाटपाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे. कागल तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत राजकीय गणिते अनपेक्षितपणे बदलत असल्याने यंदाची लढत अधिकच लक्षवेधी ठरणार आहे.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या बारा जागा आहेत. (announced)युतीच्या चर्चेनुसार जिल्हा परिषदेतील तीन जागा मंत्री मुश्रीफ गटाला, दोन जागा संजय घाटगे गटाला आणि एक जागा समरजितसिंह घाटगे गटाला मिळणार असल्याची माहिती आहे. पंचायत समितीच्या जागाही साधारणपणे समसमान वाटप केल्याचे बोलले जात आहे. मेळावे घेऊन दबाव तंत्राचा वापर झाल्याचेही राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.मुश्रीफ हे तालुक्यातील मोठे नेतृत्व मानले जात असले तरी दोन्ही घाटगे गटांना सांभाळताना त्यांना अपेक्षेपेक्षा कमी जागांवर समाधान मानावे लागल्याचे चित्र आहे. कागल नगरपालिकेतील राजकारणातही हे बदल दिसून आले होते. समरजितसिंह घाटगे यांनी यापूर्वी शाहू आघाडीकडून उमेदवार उभे केले होते, मात्र आता ते भाजपच्या चिन्हावर उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, संजय मंडलिक यांनी या परिस्थितीचा अंदाज घेत(announced) आधीपासूनच गटनिहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घेत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद महिला आरक्षित झाल्यामुळे काही गटांतील लढती विशेष महत्त्वाच्या ठरणार आहेत. तालुक्यातील बहुतांश जागा महिलांसाठी आरक्षित असल्याने उमेदवार निवडीसाठी युतीकडे इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे.एकीकडे मुश्रीफ आणि घाटगे यांची युती मजबूत होत असताना, दुसरीकडे मंडलिक हे नाराज कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीतील घटकांना सोबत घेऊन स्वतंत्र रणनिती आखण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कागल तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक केवळ जागावाटपापुरती न राहता प्रतिष्ठेची आणि राजकीय ताकद आजमावणारी ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
हेही वाचा :
चपातीऐवजी भाकरी खाणं खरंच योग्य आहे का? जाणून घ्या सल्ला अन् शरीरावर होणारे परिणाम
SBI च्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! नवीन नियम लागू?
फक्त 180 रुपयांची दारू, पण तुफान गाजली! फक्त हिवाळ्यात विकल्या गेल्या 17,90000 बॉटल्स