कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

राज्यभरातील 29 महापालिकांच्या महापौर पदाची नुकतीच आरक्षण सोडत काढण्यात आली.(Continued) मुंबई महापालिकेचे महापौर पद महिला खुला प्रवर्गासाठीआरक्षित करण्यात आले आहे तर कोल्हापूरचे महापौर पद नागरिकांचा मागासवर्ग ओबीसी यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. महापौर पद हे अडीच वर्षांच्या मदतीसाठी असले तरी कोल्हापुरात मात्र या पदाच्या मुदतीची खांडोळी करण्याची लोकशाहीशी विसंगत असलेली परंपरा आहे. आता त्याची लागण इचलकरंजी महापालिकेला सुद्धा झाली आहे.कधी कोविड मुळे तर कधी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत गेल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रक्रिया पार पाडली जात आहे. अगदी सुरुवातीला नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. जानेवारी महिन्याच्या दिनांक 15 रोजी 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न झाली.त्याचे निकालही लागले आणि आता महापौर पदाच्या निवडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिले आहे. सध्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची धामधूम ग्रामीण भागात सुरु आहे.

त्याचे निकाल फेब्रुवारी महिन्यात लागणार आहेत. (Continued) राज्यातील महापालिकांच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर महापौर पदासाठी मंत्रालयात नुकतीच आरक्षण सोडत काढण्यात आली. नगर विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत काढण्यात आली. ही सोडत प्रक्रिया सदोष झाली असल्याचा ठपका ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून ठेवण्यात आला होता आणि त्याला माधुरी मिसाळ यांनी स्पष्टीकरण दिले होते. कोल्हापूर महापालिकेचे महापौर पद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे. महायुतीने या महापालिकेत बहुमत प्राप्त केले आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्यामुळे महापौर पद भाजपकडे जाणार आहे. ओबीसी प्रवर्गातील अनेक सदस्य भाजपाकडे आहेत.आणि या पदासाठी इच्छुकही अनेक जण आहेत. त्यामुळे महापौर पदाच्या मुदतीची खांडोळी केली जाणार आहेत. दोघा जणांना प्रत्येकी एक वर्ष आणि उरलेले सहा महिने आणखी एका उमेदवारालाअसे अडीच वर्षात तीन महापौर देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे.

इचलकरंजी महापालिकेची यंदाचे झालेली ही पहिली निवडणूक आहे. (Continued) त्यामुळे या शहराचा पहिला महापौर बनवण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. मात्र या महापालिकेतही प्रत्येकी 10 महिने मुदतीचे तीन महापौर केले जाणार असल्याचे भाजपचे जेष्ठ नेते सुरेश हळवणकर यांनी स्पष्ट केले आहे.पूर्वी महापौर पदाची मुदत एक वर्षांची होती. या एका वर्षात महापौराला कोणतेही विकास काम करता येत नाही म्हणून महापौर पदाची मुदत अडीच वर्षे करण्यात आली. महापौर होण्यासाठी अनेकांची धडपड असते. पण प्रत्येकाचे समाधान करता येत नाही. मात्र अडीच वर्षात किमान तिघा जणांची महापौर पदावर वर्णी लावता येते हे लक्षात आल्यानंतर महापालिकेचे नेतृत्व करणाऱ्यांनी महापौर पदाच्या मुदतीची खांडोळी करायला सुरुवात केली. कोल्हापूर महापालिकेचे नेतृत्व जवळपास 18 वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे होते. त्यांनी एक वर्षाची मुदत असलेल्या महापौर पदाची सुद्धा खांडोळी करून एका वर्षात चक्क तीन महापौर दिले. तीन महिन्याचा महापौर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. महापौर पद त्या शहराचे सर्वोच्च पद असते.

या पदाच्या मांडवाखालून एकापेक्षा अधिक लोकांना नेण्याचा प्रयत्न (Continued) तेव्हा महाडिक यांनी केला होता. लोकशाहीशी पूर्णपणे विसंगत असलेल्या या प्रकाराची तेव्हा राज्यभर नकारात्मक चर्चा झाली होती. महादेवराव महाडिक यांनी सुरू केलेली ही महापौर पदाच्या मदतीची खांडोळी करण्याची प्रथा किंवा परंपरा खंडित करण्याची संधी असतानाही हीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय भाजप अर्थात महायुतीने घेतलेला आहे. दोघाजणांना प्रत्येकी बारा महिने आणि उर्वरित एकाला सहा महिने या पदावर विराजमान केले जाणार आहे. महापौरांना एका वर्षात विकास काम करता येत नाही म्हणून या पदाची मुदत अडीच वर्षे करण्यात आली. पण या हेतूचा पराभव सध्या केला जातो आहे.महापौर पदाच्या मुदतीची खांडोळी करण्याची लोकशाहीशी विसंगत असलेल्या परंपरेची लागण इचलकरंजी महानगरपालिकेला सुद्धा झाली आहे. या महापालिकेचे महापौर पदाचे आरक्षण ओबीसी या प्रवर्गासाठी आहे. इथेही महापौरव पदासाठी अनेक जण इच्छुक असल्यामुळे इच्छुकांची एक बैठक घेऊन भाजपचे नेते सुरेश हळवणकर यांनी अडीच वर्षात प्रत्येकी दहा महिने मुदतीचे तीन महापौर केले जातील असे सांगितले आहे.
एकूणच ज्या उद्देशाने महापौर पदाची मुदत अडीच वर्षांसाठी करण्यात आली आहे त्या हेतूलाच नेत्यांकडून हरताळ फासला जाऊ लागल्याचे चित्र दिसते आहे.

हेही वाचा :

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे दुःखद निधन; चाहत्यांना मोठा धक्का!

प्रत्येक गोष्टीत राजकारण कशाला?…

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत काळ मटण, नोट करून घ्या रेसिपी