क्रिकेट विश्वातील उदयोन्मुख आणि लोकप्रिय फलंदाज रिंकु सिंह याला सायबर गुन्हेगारांकडून (Facebook) मोठा धक्का बसला आहे. रिंकु सिंह यांचे फेसबुक खाते हॅक झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी अलीगड पोलिसांच्या सायबर शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रिंकु सिंह यांचे फेसबुक खाते त्यांच्या परवानगीशिवाय अन्य व्यक्ती चालवत असल्याचे आढळून आले. या प्रकाराची तक्रार रिंकु सिंह यांच्या भावाने, सोनू सिंह याने सायबर सेलमध्ये दिली होती. त्या आधारे एफआयआर नोंदवण्यात आला. हॅकर्सने रिंकु सिंह यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स बदलून त्यांच्या नावाने अनेक पोस्ट केल्याचेही समोर आले आहे.

रिंकु सिंह यांचे फेसबुकवर सुमारे 1.6 दशलक्ष फॉलोअर्स (Facebook) असून हे खाते मोनेटाईज्ड आहे. त्यामुळे या खात्यातून मोठ्या प्रमाणावर कमाई होत होती. हॅकर्सने केवळ फेसबुक अकाऊंटच नव्हे तर त्याच्याशी संबंधित ई-मेल आयडी आणि बँक खात्याचे तपशीलही बदलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी रिंकु सिंह यांनी आपले फेसबुक खाते उघडण्याचा प्रयत्न केला असता आयडी आणि पासवर्ड असूनही लॉगिन होऊ शकले नाही. तसेच बँक खात्याच्या तपशीलांमध्येही अनोळखी बदल दिसून आल्याने त्यांना संशय आला.
त्यानंतर हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. तपासात असे आढळले की, रिंकु सिंह यांचा फेसबुक आयडी मूळतः त्यांच्या वैयक्तिक ई-मेल आयडीशी जोडलेला होता. मात्र हॅकर्सने तो ई-मेल आयडी हटवून त्याऐवजी एक व्यावसायिक ई-मेल आयडी जोडला. परिणामी, फेसबुकवरील कमाईसंदर्भातील सर्व माहिती आणि रक्कम थेट हॅकर्सच्या खात्यात वळवली जात होती.
या तक्रारीनंतर सायबर सेल अधिक सक्रिय झाला असून, (Facebook) खाते बदलण्यासाठी वापरण्यात आलेला आयपी अॅड्रेस आणि ई-मेल आयडी ट्रॅक करण्याचे काम सुरू आहे. तसेच अकाऊंट रिकव्हरीसाठी फेसबुक आणि मेटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात हॅकर्सनी कोणाला फसवले का, पैशांची मागणी केली का किंवा कोणते आर्थिक व्यवहार झाले का, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे केवळ रिंकु सिंहच नव्हे तर इतर सेलिब्रिटी आणि खेळाडूंमध्येही चिंता निर्माण झाली आहे. सायबर भामट्यांनी अतिशय चतुराईने ही फसवणूक केल्याने ती वेळेत लक्षात आली नाही. रिंकु सिंह यांना नेमका किती आर्थिक फटका बसला आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा :
फक्त 1 रुपयासाठी या अभिनेत्याने नाकारलेला अमिताभ बच्चन यांचा चित्रपट
पाऊस पडूनही राज्याच्या अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई