नवी मुंबईत भंगार विक्रीच्या आडून सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या रॅकेटचा (drug racket) नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नेरुळ परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे २२ लाख रुपयांच्या किंमतीचे हेरॉईन आणि गांजा जप्त करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेरुळ सेक्टर २८ मधील रेल्वे पटरीलगत असलेल्या एका झोपडीतून भंगार विक्रीच्या व्यवसायाच्या नावाखाली अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस अधिकारी आणि पंधरा अंमलदारांच्या पथकाने बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.

झोपडीत केलेल्या तपासणीत (drug racket) पोलिसांना ४३.६ ग्रॅम हेरॉईन आणि २६ ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत सुमारे २२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात राकेश सचिन वाघरी (१८), राजेंद्र भीमा काळे (५५), अनिता संजय पवार (२९), राजू बाबू राठोड (२८), शिवराम लक्ष्मण पवार (३२), कमळाबाई बाबू राठोड (५५) आणि सुमन राजू राठोड (२५) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध नेरुळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी राजू राठोड हा (drug racket) सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर यापूर्वीही मारहाण, चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्याचे भंगार दुकान अनधिकृत जागेवर उभारलेले असल्याचे आढळून आले असून ते हटवण्यासाठी पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.
या प्रकरणातील विशाल आणि गंगा काळे या दोन संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा :
घरात हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी, नियम आणि फायद्यांबद्दल माहिती आहेत?
या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार