शरीराला भरपूर प्रथिने(protein) मिळवण्यासाठी अनेकजण काजू-बदाम किंवा महागडे ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला देतात. मात्र हे सुकामेवे किमतीने महाग असल्यामुळे दररोज सेवन करणे सर्वांसाठी शक्य नसते. पण काजू-बदामपेक्षाही एक असा स्वस्त आणि परवडणारा सुकामेवा आहे जो शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतो — तो म्हणजे शेंगदाणा. हिवाळ्याच्या दिवसांत शेंगदाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. शेंगदाणे-गुळाचे लाडू तर जवळजवळ प्रत्येक घरात बनवले जातात. हे फक्त चविष्ट नसून शरीराला ऊर्जा देणारे असतात. त्यामुळे शेंगदाण्यांना ‘स्वस्त ड्रायफ्रूट’ किंवा ‘परवडणारे सुपरफूड’ म्हटले जाते. कारण त्यात काजू-बदामसारखेच सर्व पोषक घटक असतात.

शेंगदाणे हे प्रथिनांनी समृद्ध आहेत. 100 ग्रॅम शेंगदाण्यात सुमारे 25 ते 26 ग्रॅम प्रथिने असतात — म्हणजेच अंडी (13 ग्रॅम) आणि काजू (18 ग्रॅम) यांच्यापेक्षा अधिक! त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी शेंगदाणे हे एक उत्कृष्ट प्रथिनांचे नैसर्गिक स्रोत आहे.याशिवाय शेंगदाण्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स असतात, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. त्यातील रेझवेराट्रोल हे अँटीऑक्सिडंट हृदय मजबूत करण्यास मदत करते.

अनेकांचा समज असतो की शेंगदाणे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो, पण प्रत्यक्षात उलट असते. शेंगदाण्यातील फायबर आणि प्रथिने पोट जास्त वेळ भरल्यासारखे ठेवतात, ज्यामुळे जास्त खाणे टाळले जाते आणि वजन नियंत्रणात राहते.मेंदूच्या आरोग्यासाठीही शेंगदाणे अत्यंत फायदेशीर आहेत. त्यातील नियासिन आणि(protein) व्हिटॅमिन बी3 मेंदूची कार्यक्षमता वाढवतात आणि अल्झायमर सारख्या आजारांना दूर ठेवतात. मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी शेंगदाणे किंवा पीनट बटर हा उत्तम नाश्ता पर्याय आहे.

त्वचा आणि केसांसाठीही शेंगदाणे वरदान आहेत. त्यातील व्हिटॅमिन ई आणि झिंक त्वचेला चमक देतात, वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात आणि केसांना मजबूत करतात. शेंगदाण्याचे तेल हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून वापरले जाते.शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ते मधुमेहींसाठीही सुरक्षित आहेत. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास ते मदत करतात. मात्र, इतर गोष्टींसारखेच शेंगदाण्यांचे सेवनही मर्यादित प्रमाणातच करणे हितावह आहे.

थोडक्यात, शेंगदाणे हे काजू-बदामपेक्षाही परवडणारे आणि पौष्टिक सुपरफूड असून दररोज मूठभर शेंगदाणे खाणे शरीर, हृदय, मेंदू, त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहीणींसाठी मोठी बातमी…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का!
‘मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे’, सुपरवायझर म्हणाला, ‘कपडे काढा…