भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (cricketers)आणि विराट कोहली यांचं टीम इंडियातील भवितव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता हे दोघे केवळ वन-डे फॉर्मेटवर लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय संघात स्थान कायम ठेवायचं असल्यास दोघांनाही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावं लागेल. त्यामुळे आगामी विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्यांचा सहभाग हा क्रिकेट विश्वातील चर्चेचा विषय बनला आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, बीसीसीआयने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना विजय हजारे ट्रॉफीत सहभागी होण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामागे उद्देश असा आहे की, दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी सातत्य टिकवून ठेवण्यासाठी देशांतर्गत स्तरावर सामने खेळावेत आणि आपल्या फॉर्ममध्ये राहावं. बीसीसीआय सूत्रांनी सांगितलं की, “दोघेही कसोटी आणि टी-२० मधून बाहेर असल्यामुळे आता वन-डे फॉर्मेटमध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे.”
रोहित शर्माने यापूर्वीच मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवलं आहे की तो विजय हजारे ट्रॉफीत खेळणार आहे. ही स्पर्धा २४ डिसेंबरपासून सुरू होत असून, त्यापूर्वी तो २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही खेळणार आहे. दुसरीकडे, विराट कोहलीने मात्र अद्याप आपल्या सहभागाबद्दल कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही.बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनीही अलीकडेच सांगितले होते की, “टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणं आवश्यक आहे. खेळाडूंकडे (cricketers)जर वेळ असेल, तर त्यांनी आपल्या राज्य संघासाठी खेळायला हवं.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अलीकडील वन-डे मालिकेत रोहित आणि कोहली दोघांनी पुनरागमन केलं होतं. या मालिकेत रोहितने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावत ‘सामनावीर’ पुरस्कार जिंकला, तर कोहलीने शेवटच्या सामन्यात ७४ धावांची उल्लेखनीय खेळी केली.आता हे दोघे खेळाडू २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताच्या योजनांमध्ये असतील की नाही, हे त्यांच्या आगामी देशांतर्गत कामगिरीवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे रोहित आणि कोहली या दोघांकडेच आता सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

हेही वाचा :
अंबाबाई, जोतिबा मंदिरसह आदमापूर, नृसिंहवाडी, खिद्रापुरात सुरक्षा यंत्रणेत वाढ
भारतात लाँच होणार दमदार OnePlus 15, पॉवरफूल चिप अन् 7300mAh ची बॅटरी
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…