तुमचा जुना मोबाईल नंबर (number)एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या हातात गेला, तर त्याचे परिणाम किती धोकादायक ठरू शकतात याचा प्रत्यय देणारी एक घटना सध्या चर्चेत आहे. Reddit वर एका युजरने अशीच एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. त्या युजरने सांगितले की, त्याला नवीन सिम कार्ड मिळाल्यानंतर अनोळखी लोकांचे फोन येऊ लागले. तपासणी केल्यावर लक्षात आले की, हा नंबर पूर्वी ‘किरण’ नावाच्या व्यक्तीचा होता आणि तो झोमॅटो, स्विगी, उबर, फेसबुकसारख्या अनेक प्लॅटफॉर्मशी जोडलेला होता. त्यामुळे नवीन सिमधारकाला त्या व्यक्तीच्या अकाउंट्समध्ये लॉगिन करण्याची संधी मिळाली होती.

त्या युजरने पुढे सांगितले की, तो किरणच्या फेसबुक अकाउंटवर सहज लॉगिन करू शकला आणि त्याची वैयक्तिक माहिती पाहू शकला. झोमॅटो आणि उबरसारख्या सेवांवरही त्याला पूर्वीच्या अकाउंट्समध्ये प्रवेश मिळाला. यामुळे स्पष्ट झाले की, जुन्या मोबाईल नंबरचा पुनर्वापर झाल्यानंतर सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक माहितीची गळती होण्याचा गंभीर धोका निर्माण होतो.

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नियमानुसार, जर एखाद्या युजरने 90 दिवसांपर्यंत नंबर रिचार्ज केला नाही, तर तो नंबर ‘निष्क्रिय’ म्हणून घोषित केला जातो आणि नंतर कंपनी तो नवीन युजरला पुन्हा जारी करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने 2023 मध्ये स्पष्ट केले होते की, कंपन्यांना हे थांबवता येणार नाही. मात्र, या नियमांमुळे नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता वाढली आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते, जर तुमचा जुना मोबाइल नंबर(number) आता दुसऱ्या व्यक्तीला दिला गेला असेल, तर तुम्ही तात्काळ सर्व डिजिटल खात्यांमधून तो नंबर बदलावा. सर्वात आधी बँक खाते आणि यूपीआय अॅप्स (जसे की पेटीएम, गुगल पे, फोनपे) मध्ये नवीन नंबर अपडेट करावा. त्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील “Phone Number” सेक्शनमध्ये जाऊन जुना नंबर हटवावा. तसेच झोमॅटो, स्विगी, ओला, उबर यांसारख्या अॅप्समध्ये प्रोफाइल सेटिंग्जमधून नवीन नंबर जोडावा आणि ओटीपीद्वारे पुन्हा पडताळणी करावी.

सायबर सुरक्षा राखण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) असलेल्या सर्व खात्यांमध्ये नवीन नंबर व ईमेल आयडी अपडेट करणे अत्यावश्यक आहे. अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी जुना नंबर निष्क्रिय ठेवू नये आणि नंबर बदलल्यास लगेच सर्व अॅप्समध्ये बदल करावा. तसेच ईमेल अकाउंटवरील सिक्युरिटी नोटिफिकेशन्स आणि लॉगिन अ‍ॅलर्ट्सवर लक्ष ठेवणेही गरजेचे आहे.

तज्ज्ञांच्या मते, जर जुना मोबाईल नंबर चुकीच्या हातात गेला, तर तो तुमच्या डिजिटल ओळखी, आर्थिक सुरक्षितता आणि वैयक्तिक माहितीला गंभीर धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे सतर्क राहणे आणि वेळेवर आवश्यक बदल करणे हेच सर्वात प्रभावी सुरक्षा उपाय आहेत.

हेही वाचा :

दिल्लीतील स्फोटामुळे हा मोठा सामना रद्द होणार
आता पाकिस्तानची वाटचाल लष्कराच्या राजवटीकडे…..?
दिल्ली बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी उमरचा पहिला फोटो समोर