अभिनेत्री (actress)रश्मिका मंदानाने केलेल्या एका विधानावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. “पुरुषांनी एकदा तरी मासिक पाळीचा त्रास अनुभवायला हवा,” असं मत तिने व्यक्त केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली. मासिक पाळी आणि त्यातील स्त्रियांच्या वेदना हा गंभीर मुद्दा असताना, रश्मिकाच्या या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचं अभिनेत्रीचं म्हणणं आहे. तिच्या विधानावर पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेतल्याने हा विषय आणखी चर्चेत आला आहे.

रश्मिकाने अलीकडेच एका शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने मासिक पाळीदरम्यान महिलांना होणाऱ्या वेदना पुरुषांनीही किमान एकदा तरी अनुभवल्या पाहिजेत, जेणेकरून त्या वेदनांचं गांभीर्य समजू शकेल, असं मत मांडलं. पण या विधानावरून अनेक नेटकऱ्यांनी राग व्यक्त करत तिच्यावर टीका केली. काहींनी सोशल मीडियावर पोस्ट करून, “पुरुषांनाही वेगळ्या प्रकारच्या वेदना आणि जबाबदाऱ्या असतात,” असा प्रतिवाद केला.

या घटनेनंतर एका चाहत्याने एक्सवर रश्मिकाच्या वक्तव्याची क्लिप शेअर केली. या क्लिपसोबत त्या युजरने “रश्मिकाचं म्हणणं पुरुषांची कमीपणा दाखवण्यासाठी नव्हतं, तर स्त्रियांच्या वेदना समजून घेण्यासाठी होतं” असं लिहिलं. त्यावर प्रतिक्रिया देत रश्मिकानेही स्वतःची भूमिका स्पष्ट केली. “लोक माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढतात, म्हणून मला टॉक शोजमध्ये जायला भीती वाटते,” असं तीने लिहिलं. तिच्या उत्तरानंतरही सोशल मीडियावर या विषयावर मोठी चर्चा सुरू आहे.

रश्मिकाच्या(actress) मते तिचं विधान कोणाचाही अपमान करण्यासाठी नव्हतं. आपल्या वेदना आणि हार्मोनल बदलांविषयी सांगताना महिलांना गंभीरपणे घेतलं जात नाही, अशी तिची तक्रार आहे. त्यामुळे पुरुषांनी एकदा तरी हा त्रास अनुभवायला हवा, जेणेकरून या वेदनांचं खऱ्या अर्थाने आकलन होईल, असं तिचं म्हणणं आहे. अभिनेत्रीचं हे स्पष्टीकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टॉक शो दरम्यान रश्मिकाने स्वतःचा अनुभव सांगताना, मासिक पाळीदरम्यान तिला प्रचंड वेदना होतात आणि यामुळे ती एकदा बेशुद्धही पडली होती, असं सांगितलं. या समस्येसाठी तिने अनेक वैद्यकीय चाचण्या देखील केल्या, मात्र यामागचं नेमकं कारण अद्याप डॉक्टरांना समजलं नाही, असंही ती म्हणाली. “प्रत्येक महिन्यात देवाला विचारते, मला इतक्या वेदना का देत आहात?” असं भावूकपणे ती म्हणाली.

रश्मिकाच्या या वक्तव्यामुळे महिलांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अनेक महिला तिचं समर्थन करताना दिसत आहेत, तर काहींना वाटतं की पुरुषांच्या जबाबदाऱ्या आणि वेदनांबद्दलही तिने विचार करायला हवा होता. मात्र अभिनेत्रीच्या मते, तिचं विधान महिलांच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी होतं, पुरुषांना कमी लेखण्यासाठी नव्हतं.

हेही वाचा :

बाल दिनानिमित्त शेअर करा मराठमोळ्या शुभेच्छा,कोट्स आणि whatsapp status
हिवाळ्यात शरीरासाठी लोणचं घातक आहे का? काय सांगतात आयुर्वेद तज्ज्ञ
जेवण बनवण्यासाठी मातीची भांडी वापरणे शुभ असते की अशुभ?